Ad will apear here
Next
दक्षिण कोकणची रंगभूमी - दशावतारी नाट्य


पाच नोव्हेंबर हा मराठी रंगभूमी दिन! त्या निमित्ताने, दक्षिण कोकणातील वैभवशाली दशावतारी नाटक परंपरेवर प्रकाश टाकणारा हा लेख!
..........
मराठी रंगभूमीचा जन्म पाच नोव्हेंबर १८४३ रोजी झाला. आज तिचा १७७वा जन्मदिन. प्रथम मराठी रंगभूमीला ‘नमन नटवरा!’ सांगलीचे विष्णुदास भावे हे मराठीतील आद्य नाटककार. त्या वेळी सांगली हे संस्थान होते. सांगली संस्थानचे राजे पटवर्धन यांच्या आग्रहामुळे त्यांच्याच दरबारात विष्णुदास भावे यांनी ‘सीता स्वयंवर’ या नाटकाचा प्रयोग केला. तो दिवस आजचा होता. या नाटकाचा जन्मशताब्दी सोहळा थोर नाटककार स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या अध्यक्षतेखाली ५ नोव्हेंबर १९४३ रोजी उत्साहात साजरा झाला. तेव्हापासूनच हा दिवस ‘रंगभूमी दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो.

जवळजवळ १७७ वर्षांपूर्वीची ही घटना. सांगलीलाही ‘नाट्यपंढरी’ हा किताब देणारी. त्या वेळी ‘सीता स्वयंवर’ या नाटकाचे प्रयोग महाराष्ट्रभर झाले. नाट्यकलावंत असलेल्या विष्णुदास भावे यांनी कळसूत्री बाहुल्यांच्या आधारे हा पहिला प्रयोग केला; पण त्यापूर्वी अनेक शतके कोकणात ‘दशावतार’ जन्माला आला. तो दक्षिण कोकणातील नाट्याचा खराखुरा सांस्कृतिक वारसा! आज मराठी रंगभूमी दिनी कोकणाच्या वारशाची ओळख या लेखातून करून देणार आहे. 



‘रसाळ सोने-मधाचा ठेवा- कोकणचा दशावतार’
कोकण म्हटले, की आपल्या डोळ्यासमोर येते ‘दशावतारी नाट्य.’ कोकणचा भाग भौगोलिकदृष्ट्या सुरू होतो पालघरपासून आणि संपतो सिंधुदुर्गच्या बांदा भागात. या प्रत्येक भागाचे सांस्कृतिक वैभव वेगवेगळे. दशावतार सुरू होतो सिंधुदुर्गच्या देवगड भागातून आणि त्याचे क्षेत्र कणकवली, मालवण, वेंगुर्ले, कुडाळ, दोडामार्ग करीत थेट गोवा प्रांतापर्यंत विस्तारत जाते. गोवा प्रांतात पेडणे, डिचोली, साखळी आदी भाग (जो पूर्वी सावंतवाडी संस्थानात होता.) तिथपर्यंत आपणास दशावतारी नाटकांचा प्रभाव जाणवतो!

दशावतारी नाट्य म्हणजे विष्णूने साकारलेले दहा अवतार - मत्स्य, कूर्म, वराह, नृसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध आणि कलकी - या अवतारांवर आधारलेले नाट्य, असा त्याचा ढोबळ अर्थ होतो. विष्णू हा सृष्टीचा पालनकर्ता. त्याचे एकूण २४ अवतार. त्यात दहा अवतारांना नाट्याच्या दृष्टीने विशेष महत्त्व असले, तरी त्यातील अनुक्रमे पहिले चार (मत्स्य, कूर्म, वराह, नृसिंह) प्राणिसदृश असल्यामुळे त्यांना दशावतारी रंगमंचीय नाट्यात स्थान नाही. शेवटचे दोन (बुद्ध आणि कलकी) काल्पनिक आहेत. म्हणून त्यांनाही रंगमंचीय नाट्यात स्थान नाही. वामन, परशुराम, श्रीराम आणि कृष्ण या चार अवतारांतच दशावतारी नाट्य मर्यादित राहते. सोबत देव, दानव, नारद, संकासूर आणि पूर्व दशावतारात गणपती, ऋषी, सिद्धी आदी पात्रे येतात.

‘नेटके खेळता दशावतारी, तेथे येती सुंदर नारी,
नेत्र मोडिती कळकुसरी, परि ते अवघे धटिंगण।’
हा समर्थ रामदासांचा दासबोधातील श्लोक. या श्लोकावरून समर्थ रामदासांचादेखील कोकणातील दशावतारी नाटकांबद्दल किती बारकाईने अभ्यास होता हे जाणवते. याबाबत समर्थांची विनोदबुद्धी आपणास चकित करून टाकत असली, तरी दशावतारी नाटकात हुबेहूब स्त्रियांसारख्या नेत्रपल्लवी करणाऱ्या नट्या आपणास दिसत असल्या, तरीही त्या नट्या नसून ते काम करणारे सर्व पुरुष नट असतात, असे समर्थांनी सांगितले आहे. यावरून असे स्पष्ट होते, की दशावतारी नाटकात स्त्रियांची कामे पुरुष नट मंडळीच करीत असतात आणि तेदेखील एवढे हुबेहूब असे, की आपणास त्यातील फरक ओळखूही येऊ नयेत आणि त्याचा मनाला चकवा व्हावा.

जत्रेची नाटके, नाटकांची जत्रा
कोकणातील जत्रा आणि जत्रेतील रात्री दशावतारी नाटकांनीच रंगत असतात. प्रत्येक मंदिरातील जत्रेची तिथी ठरलेली असते. त्या तिथीला कोणत्या दशावतारी नाटक मंडळींचे नाटक होणार हे ठरलेले असते. वालावलकर दशावतारी नाट्यमंडळ, गोरे दशावतारी नाट्यमंडळ, चेंदवणकर दशावतारी नाट्यमंडळ, पार्सेकर दशावतारी नाट्यमंडळ आदी अनेक जुनी नाट्यमंडळे! आता ती संख्या काही शेकड्यात जाऊन पोहोचली आहे. यात काम करणारे नट हे शेतकरी कुटुंबातील असतात. पूर्वी यांचे शिक्षण जरी कमी झालेले असले, तरी पुराणकथांचा त्यांचा अभ्यास फारच दांडगा असायचा. कारण ते नाटकातून सादर करत असलेले नाट्यप्रसंग, ज्यांना दशावतारी आख्याने असे म्हटले जाते, ती पुराणकथांवर आधारित असायची. साधारणतः रामायण-महाभारत महाकाव्यातील, तसेच शिवपुराण, विष्णुपुराण, नवनाथ कथा इत्यादी पुराणातील विविध नाट्यमय आणि उद्बोधक प्रसंग निवडून त्यांचे नाट्यरूपांतर केलेले असायचे. त्यातून कळत-नकळत धर्मशिक्षण आणि लोकशिक्षणाचा संस्कार व्हायचा. घाटमाथ्यावर कीर्तनकार, प्रवचनकार होते, त्यांनी भारुडे, लळित या लोकगीतांनी समाज संस्कारित केला. कोकणातील शेतकरीवर्गाकरिता तेच काम करण्यासाठी पुराणकथांचा आधार घ्यावा लागला. वेद आणि उपनिषदे दशावतारी कलावंतांच्या अभ्यासापलीकडची होती. त्यापेक्षा पुराणकथांतील नाट्ये त्यांना भावली आणि त्याच नाट्यांनी रंगमंचीय स्थान प्राप्त केले.



‘रात्रीचो राजा, सकाळी कपाळावर बोजा’
दशावतारी कंपन्यांच्या पूर्वीच्या हलाखीच्या परिस्थितीचे वर्णन वरील मालवणी म्हणीत आपणास सापडते. दशावतारी कंपनीत काम करणारा प्रत्येक नट म्हणजे एक स्वयंभू नाटक कंपनी असते. रात्री सादर होणाऱ्या नाट्यसंहितेचा लेखक तो, दिग्दर्शक तो, रंगभूषाकार तो, वेशभूषाकार तो आणि नेपथ्यकारही तोच. त्या नाटकाला लिखित संहिता अशी नसते. दशावतारी नाट्यसंचात प्रत्येक नटाची स्वतंत्र पत्र्याची पेटी असायची. (आता ती जागा आधुनिक सूटकेसने घेतली आहे.) या पेटीत रंगभूषा, वेशभूषेचे सामान, तलवारी आणि इतर सामान असते. एका गावाहून प्रयोग करून सकाळी दुसऱ्या गावी जात असताना प्रत्येक दशावतारी नट आपली ती पेटी डोक्यावर घेऊन जायचा. जाता जाता त्या गावी सादर करावयाच्या नाटकाचा विषय, संवाद ह्यांची बांधणी व्हायची. हे सर्व त्या दशावतारी कलावतांच्या डोक्यावर असणाऱ्या पेटाऱ्याच्या वाहतुकीच्या वेळी, पायी रस्ता तुडवीत जात असताना डोक्यावर पेटाऱ्याचा बोजा असे आणि डोक्यात रात्री सादर होणारे नाट्य आकार घ्यायचे.

फोटो : इंद्रजित खांबे (ruralindiaonline या वेबसाइटवरून साभार)

दशावतारी पेटारा : अमूल्य ठेवा
प्रत्येक दशावतारी नाट्यमंडळाच्या मालकापासून त्या दशावतारी नाट्यातील कलावंतापर्यंत, सर्वांना ‘दशावतारी पेटारा’ आपले दैवत वाटते. तो पेटारा त्यांचा ‘पंचप्राण’ असतो. हे पेटारे बांबूपासून विणलेले असतात. त्यात गणपतीचा मुखवटा, दोन लाकडी हात, समई, निरांजन, पंचारती आणि देवपूजेचे साहित्य असते. रंगपटात प्रयोगापूर्वी हे सर्व मांडून गणेशाची पूजा केली जाते. दशावतारी सर्व पात्रे रंगपटात रंगून झाली, की ‘गुरुदेव दत्त’ असा सामूहिक जयजयकार करतात. ‘नवलगुरू रायाची धन्य आरती’ ही आरती रंगपटात सादर करतात आणि दशावतारी नाटकाला प्रारंभ करण्यासाठी रंगमंचाकडे म्हणजेच मंदिरातील बाकड्याकडे प्रयाण करतात.

दहीकाला आणि दशावतारी नाट्य
गावातील जत्रेत विधिपूर्वक दशावतारी नाट्य मंदिरात साकार होते आणि त्याची भैरवी कृष्णाकडून पहाटे गाडगे फोडून केली जाते. त्याला दहीकाला म्हणतात. त्या वेळी दशावतार नाट्य सादर होतेच. इतर वेळी करमणुकीचे साधन म्हणून ते सादर करतात तेव्हा त्याला ‘दशावतार नाटक’ असे संबोधले जाते. त्या वेळी त्याला दहीकाला असे म्हणत नाहीत.

दशावतारी नाटकाची वैशिष्ट्ये सांगायची झाल्यास, प्रत्येक पात्राची पल्लेदार स्वगते, स्पष्ट उच्चार, कमावलेले आवाज, पुरुषांनी साकारलेली ‘स्त्री’ भूमिका आणि संगीत नृत्यमय लढाया! दशावतारी नाट्यात नेहमी देवांनी दानवांशी केलेला संघर्ष, त्यातून दृष्ट प्रवृत्तीचा झालेला नाश आणि अंतिम विजय सत्याचाच होतो, याचे दर्शन होते. येथे पात्र परिचय केला जात नाही. नारद, शंकर, विष्णू ही पात्रे रंगभूषेवरून, वेशभूषेवरून ओळखू येतात; पण त्या दशावतारी नाटकाचा नायक- राजा किंवा खलनायक, राक्षस, त्यांच्या पत्नी आपला उल्लेख पल्लेदार स्वगतामधूनच करतात. ते प्रारंभीचे पल्लेदार स्वगत समोरील प्रेक्षक कानात प्राण एकवटून ऐकत असतात आणि त्यानुसार मनात कथानकाची बांधणी करतात. दशावतारी नटदेखील दशावतार सादर होत असताना समोरील पात्राच्या संवादानुरूप आपल्या संवादाची बाधणी रंगमंचावरच करीत असतात. स्वतःची भूमिका सादर करीत असताना दशावतारी कलाकाराला कोणीही दिग्दर्शक नसतो. मूळ ग्रंथातील त्या पुराण कथेला कोणताही धक्का न पोहोचवता नाटक पुढे जात असते. शेवटपर्यंत तो नट प्रामाणिक राहतो त्या पुराणकथेशी आणि आपल्या प्रेक्षकाशी.

रंगमंच नाही, नेपथ्य नाही!
ही दशावतार नाटके मंदिरात अगर मंदिराबाहेर होतात. असलाच तर त्याला पडदा चालतो. नसेल तर मंदिराची भिंत पडद्याचे काम करते. रंगमंच म्हणजे दशावतारी नाटकासाठी तयार केलेले भरभक्कम बाकडे. तोच त्याचा स्वर्गलोक! तोच त्याचा मृत्युलोक आणि तेच त्याचे पाताळयुग! दशावतारी नट आपल्या संवादफेकीने नेपथ्य आणि रंगमंचावरील दृश्य बदलत असतात, हीच तर खरी दशावतारी नाटकाची आणि त्यात काम करणाऱ्या नटवर्यांची खासियत असते. तेच लाकडी बाकडे हीच दशावतार नाटकाची एकमेव प्रॉपर्टी, तेच बाकडे म्हणजे लेव्हल्स! ते बाकडे म्हणजेच त्यांचे डीमर आणि स्पॉट! त्या बाकड्याच्या डाव्या बाजूला पायपेटी, मृदंग अथवा तबला आणि चक्की असते! (चक्की म्हणजेच झांज). पायपेटी वाजवणारा दशावतारी नाटक मंडळाचा ‘नायक’ असतो. त्याचे दशावतारी गायन म्हणजे खऱ्या अर्थाने दशावतारी नटाला ऐन वेळी केलेले दिग्दर्शन होय. पुढील प्रवेश मृदंगाच्या थापेवर बदलत जातात. दशावतारी नाट्यप्रवेशाला ‘कचेरी’ असे म्हणतात. संपूर्ण दशावतारी नाटकात पायपेटी, मृदंग आणि चक्की ही तीन वाद्ये प्राण ओततात. प्रसंग बदलताच, त्यांची भूमिका दशावतारी नाट्यात मोलाची मानली जाते.

दशावतार-आडदशावतार!
दशावतारी नाटकात दशावतार आणि आडदशावतार असे दोन भाग असतात. त्यांना आपण पूर्वरंग आणि उत्तररंग असे म्हणू या. या दशावतारी नाटकाच्या पूर्वरंगात भगवान श्री विष्णूच्या पहिल्या अवताराचे (मत्स्य अवताराचे प्रतीक म्हणून) शंक अर्थात संकासुराचे दर्शन आपणास घडते. पूर्वरंगात संकासुराचे बोलणे ‘मालवणी’ बोलीतून होते. तो ‘संकासूर’ ग्राम्य विनोद करतो. त्यातून जी ‘हसवणूक’ निर्माण होते, ती रसिक प्रेक्षकांना रंगमंचाकडे खेचत जाते. प्रेक्षक पुढील दशावतार पाहण्याच्या तयारीत येतात. 

उत्तररंगात म्हणजे मूळ दशावतारात जी पुराणकथा रंगच जाते, ती मात्र अस्खलित मराठी, संस्कृतप्रचुर भाषेतच रंगत जाते. त्या वेळी त्या अल्पशिक्षित, शेतकरी, ग्राम्य नटाचे उद्गार ऐकून भाषा पंडितांनीही तोंडात बोटे घालावीत, अशी ‘स्वगते’ हे दशावतारी नट सादर करतात आणि नाटकात रंगत भरत जातात.

दशावतारी नाटकातील श्री गणेश पूजन (फोटो : डॉ. उमाकांत सामंत)

आधी वंदू तुज मोरया!
दशावतारी नाट्याचा प्रारंभ रंगमंचावर गणेशपूजनाने होतो. गणपतीची पूजा, आरती होते. पारंपरिक गीते म्हटली जातात. सूत्रधार आणि गणपती यांचे सवाद रंगतदार आणि पारंपरिक असतात. त्यात विशेषतः बदल नसतो. पुढील नाट्यप्रवेश निर्विघ्न पार पडण्यासाठी गणपतीला प्रार्थना केली जाते. ‘रघुवीर रणधीर स्मरा’, ‘करू गजवदन चरणी नमना’ अशा प्रकारची नाट्यपदे म्हटली जातात. संपूर्ण दशावतारी नाट्यप्रवेशात दशावतारी नाट्यपदांची अगदी रेलचेल असते. रंगमंचावरती जर नट लढाईने किंवा शस्त्र-अस्त्राने मृत झाला, तर रंगमंचावरून पात्र निघून जाण्यासाठी तेथे टाकायला पडता नसतो. मानवरूपी एक दशावतारी कामगार चादर डोक्यावर घेऊन रंगमंचावर प्रवेश करतो आणि त्या मृत झालेल्या राक्षसाला सुखरूप रंगमंचावरूनच म्हणजेच त्या बाकड्यावरून मागे घेऊन येतो. प्रेक्षकांची या बाबतीत काही हरकत नसते. आपणास ते दृश्य पाहून खरे तर हसू येईल; पण दशावतारी नाटकाचे खरे  रसिक त्याकडे दुर्लक्ष करून पुढे काय सादर होणार याकडे, या कलेकडेच लक्ष देत असतात.

दशावतारी येती घरा!
ज्या गावातील मंदिरात दशावतार, रात्री सादर होणार असतो ते गाव आणि मंदिराचा परिसर सकाळपासून एका वेगळ्या वातावरणाने भारावून गेलेले असते. जत्रेची दुकाने, स्त्रियांचे देवीला ओटी भरणे, देवळातील गुरवांचे गाऱ्हाण्याचे स्वर, अगरबत्तीचा आणि धुपाचा वास अशा वातावरणात जेव्हा रात्री दशावतारी नाटकात काम करणारे धिप्पाड पार्टी मंदिराच्या आवारात प्रवेश करतात, त्या वेळी त्यांना पाहिल्यावर ‘बालगंधर्वांची रुक्मिणी’ जशी म्हणते, ‘दादा ते आले ना?’ असेच शब्द प्रत्येकाच्या अंतर्मनात उमटतात. माझ्या लहानपणी तर दशावतारी नाटकापूर्वीचे वातावरण हे असे असायचे. शुभ्र धोतर, डोक्यावर दशावतारी काळी टोपी, अंगात पूर्ण बाह्यांचा शर्ट, त्यावर काळे जाकीट, लांब केसांचा अंबाडा आणि डोळ्यात रात्री भरलेल्या काजळामुळे आलेले तेज असे ते दशावतारी नट मंदिराच्या परिसरात सकाळी प्रवेश करायचे त्या वेळी त्यांना पाहण्यासाठी आणि रात्री ते कोणता दशावतारी खेळ करणार आहेत ते जाणून घेण्यासाठी आबालवृद्ध मंदिराच्या परिसरात येत असत आणि त्या देवगंधर्वांचे दर्शन घेऊन मंदिरातच घुटमळत राहत असत, एवढे आकर्षण त्या दशावतारी नटांचे असायचे. आता गावात करमणुकीची अन्य साधने आली असल्यामुळे त्यांचे महत्त्व पूर्वीपेक्षा जरा कमी झाले आहे.

...

नमन नटवरा!
पूर्वी दशावतारी नाटकात अभिनय कौशल्यावर आपले नाव कोरून अजरामर झालेले अभिनेते कोकणातील सर्वांच्या डोळ्यांसमोर अजून आहेत. राजा, देवेंद्र आदी राजपार्टी सजवणारे कै. दादा पाटकर, कै. बाबी नालंग यांच्यासारखे दमदार नट, असूर- राक्षसी भूमिका साकारणारे कै. दाजी हिवाळेकर, कै. वासुदेव सामंत, नारदाच्या भूमिकेने स्मरणात राहिलेले कै. मनोहर कवठणकर, कै. अनत बागवे, स्त्री भूमिका साकारणारे कै. धोंडी मानकर, कै. उमा बेळणेकर यांच्यासारखे भाषाप्रभू, सात्त्विक भूमिकेसाठी लक्षात राहिलेले गोविंद तावडे, बाबा पालव, विनोदी भूमिका साकारणारे वासुदेव सामंत आदी अनेक दशावतारी नटांनी आपले युग निर्माण केले आहे. दर्जेदार अभिनयाने ते दशावतारी नट ‘चिरंजीव’ झाले आहेत. आजदेखील ओमप्रकाश चव्हाण, सुधीर कलिंगण, अप्पा दळवींसारखे अनेक दशावतारी नट अभिनय क्षेत्रात आपले कर्तृत्व गाजवून आहेत.

दशावताराचं रूप बदलतंय!
दशावतारी नाटकांबद्दलच्या बऱ्याच जाणकार मंडळींच्या मतानुसार आता दशावतारी नाट्यात बदल होत आहे. त्याचा ढाचा, रूप, रंग बदलत आहे. तो बदल एक पारंपरिक लोककला म्हणून दशावतारी कलेला मारक ठरणार आहे. दशावतारी नाटकात आता ट्रिक-सीन येऊ घातलेत. प्रकाश योजनेचे साह्यही आता दशावतारी नाटके घेऊ लागली आहेत. ‘मागणी तसा पुरवठा’ हे तत्त्व जरी मान्य केले, तरी लोककलेबाबत याला क्षमा नाही. पूर्वी नट आपल्या मूळ कंपनीशी बांधील असत. त्यामुळे सादरीकरणाला एक प्रकारचा भक्कमपणा येत असे. आता काही वेळा संयुक्त दशावतार सादर होतात; पण त्यात कंपनीचा ठसा उमटलेला दिसून येत नाही. अलीकडे सुशिक्षित तरुण एक छंद म्हणून दशावतारात येऊ लागलेत. कथादेखील ‘पुराणे’ सोडून काल्पनिक होऊ लागली आहे. दशावतारांची नावे नाटक, सिनेमा या नावांवरून पडू लागली आहेत. काही तरुण बक्षिसाच्या लोभाने दशावतारात न शोभणारे विनोद करू लागले आहेत. वास्तविक दशावतारी नाटक रंगमंचावर सादर होणारे नसून, मंदिराच्या गाभाऱ्यात सादर होणारे नाटक आहे. त्याचे पावित्र्य आणि मूलस्रोत जपणे आवश्यक आहे. आता दशावतारी नाट्यमंडळींची पूर्वीची हलाखीची परिस्थिती पालटून त्यात बदल झालेला आहे. ‘रातचो राजा, सकाळी कपाळावर बोजा’ ही म्हण आता दूर गेली. कलाकार सुमो, टेम्पो या वाहनांतून प्रवास करू लागले आहेत. बहुतेक सर्व दशावतारी नाट्यमंडळांकडे स्वतःच्या गाड्या आल्या आहेत. ही आपणास अभिमानाची बाब आहे. पत्र्याच्या टंकांची जागा चांगल्या सूटकेसने घेतली; पण जुन्या अभिनयपूर्ण सादरीकरणापासून दशावतार आता फार दूर गेलेला आहे.

दशावताराची संगीत परंपरा जपायला हवी!
याबाबत दशावतारी कंपनीला अनेक वर्षे हार्मोनियमची साथ करणारे माधवराव गावकर सांगतात, ‘पूर्वी दशावतारी गायक नट प्रसंगानुरूप स्वतः गाणी तयार करून म्हणत असत; पण अलीकडे सुशिक्षित कलावंतांचा भरणा दशावतारी कंपनीत झाल्यामुळे लोकांना आवडणारी चित्रपटगीते, नाट्यगीते दशावतारात गाऊ लागले. लढाईचा पारंपरिक नाच मागे पडत असून, त्याची जागा आधुनिक नृत्याने घेतली. त्यामुळे दशावतार टीकेचा विषय होऊ लागला आहे. दक्षिणेतील ‘यक्षगान’ आज शेकडो वर्षे अबाधित राहिले. त्याला कारण ‘मेकअप’पासून सादरीकरणापर्यंत त्यांनी पारंपरिकतेत काकणभरही फरक केलेला नाही. दशावतारी परंपरा, आचारसंहिता आणि सूत्रे जपणे आणि त्यांचे संवर्धन करणे आज महत्त्वाचे आहे.’ माधवराव गावकर आणि दशावताराच्या सामान्य रसिकांचीही ही खंत आहे. त्या दृष्टीने विचार होणे आवश्यक!



बॅ. नाथ पैंचे योगदान
प्रारंभी दशावतारी नाटकांना केंद्रपातळीपर्यंत प्रसिद्धी देण्याचे काम कोकणचे लाडके नेते बॅ. नाथ पै यांनी केले. जुनेजाणते सर्व दशावतारी त्यांचे ऋण अजूनही व्यक्त करतात. त्यानंतर महाराष्ट्र मंडळाच्या सावंतवाडी शाखेने दशावतारी नाट्यमंडळांसाठी स्पर्धांचे आयोजन केले. ते नंतर सातत्यपूर्ण होत गेले. सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे सहकार्य, विविध महोत्सव आदींमुळे दशावतारी नाट्यमंडळे, नट यांना आर्थिक सुबत्ता पूर्वीपेक्षा थोडी-फार आली आहे. तरी त्यांनी आपल्या मूळ आकृतिबंधापासून दूर जाऊ नये असे जाणकारांचे मत आहे.

दशावताराचा अभ्यास
कोकणच्या दशावतारी कलेचा जसा व्हावा तसा अभ्यास आणि जसे व्हावे तसे संशोधन अजून झालेले नाही. सावंतवाडी येथील पंचम खेमराज कॉलेजचे प्राध्यापक आणि एक नाट्यअभ्यासक प्रा. विजयकुमार फातर्पेकर यांनी याबाबत बरेच संशोधन केलेले आहे. त्यांच्या मते ‘यक्षगानासाठी जसे ज्ञानपीठकार कै. डॉ. शिवराम कारंथ आणि अनेक विद्वान कर्नाटकात उडपीजवळ प्रयत्नशील होते, तसा एकही संशोधक अथवा जाणकार दशावतारासाठी महाराष्ट्रात उपलब्ध नाही.’ आज ते संशोधन होणे फार गरजेचे आहे.

जपू या अमूल्य ठेवा!
एवढे जरी असले तरी, दक्षिण कोकणची ही कला कर्नाटकातील ‘यक्षगान’, केरळची ‘कथकली’, बंगालमधील ‘जात्रा’ आदी अनेक लोककलांपेक्षा आगळी आणि वेगळी आहे. याच लाल मातीत रुजली आणि संस्कारित झाली आहे. त्या लोककलेचे जतन होणे आवश्यक आहे. कारण दशावतार म्हणजे कोकणचा सांस्कृतिक वारसा, कोकणची अस्मिता, कोकणचे वैभव! हा समृद्ध वारसा आपण भावी पिढ्यांसाठी जपला पाहिजे.

आमची माती आमची रंगभूमी
महाराष्ट्रीय रंगभूमी वेगवेगळ्या भागांत नटराजाच्या विविध रूपांत आपल्याला भेटत असते. साहित्य, नाट्य, संगीत, नृत्य, गायन, वादन, शब्दसृष्टीच्या चित्रमयतेने आभासी निर्माण केलेले नेपथ्य आदी या दशावतारी रंगभूमीची अनेक वैशिष्ट्ये आहेत. या नाट्यपंढरीच्या वारीत अनेक दशावतारी नाट्यतपस्वी आपली पताका घेऊन सामील झालेले आहेत. अनेक दशावतारी कलावंतांनी यासाठी आपला देह झिजवला. अनेक जण तो झिजवीत आहेत. हे दशावतारीही ‘पंचतुंडनर रुंडमाळधर पार्वतीशा’चे भक्तगण! त्या सर्वांना आज रंगभूमी दिनानिमित्त मराठी नाट्यरसिकांचा मानाचा मुजरा आणि आशीर्वाद!

‘तुम्हा तो शंकर सुखकर हो।’

- सुरेश श्यामराव ठाकूर, आचरे, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग
(ललित लेखक, स्तंभलेखक; कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेचे अध्यक्ष, अ. भा. साने गुरुजी कथामालेच्या मालवण शाखेचे अध्यक्ष)
मोबाइल : ९४२१२ ६३६६५





 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/OWEDCS
Similar Posts
दशावतार आणि यक्षगान दशावतार आणि यक्षगान या दोन्हीही लोककला आहेत; मात्र कर्नाटकातील यक्षगान ही कला जोपासण्यासाठी, बहरण्यासाठी जितके अभ्यासपूर्ण प्रयत्न झाले, तितके महाराष्ट्रातील दशावताराच्या बाबतीत फारसे झालेले नाहीत. या दोन्ही कलांच्या गुणवैशिष्ट्यांचा आढावा घेणारा आणि दशावताराच्या भविष्याबद्दल चिंतन करणारा हा ‘रंगवाचा’मधील लेख
जनसंस्कृती - रंगभूमीचे अनोखे विश्व ‘थिएटर ऑफ दी ऑप्रेस्ड’ (टीओ) या प्रकारच्या रंगभूमीची रचना ऑगस्टो बोल या ब्राझिलियन थिएटरिस्ट व रंगकर्मीच्या तत्त्वानुसार करण्यात आलेली आहे. त्याने अशा प्रकारच्या रंगभूमीची संकल्पना मांडली, ज्यात तळागाळातल्या आणि उपेक्षित व्यक्ती बोलतात, अभिनय करतात आणि त्यांच्या सामाजिक जीवनातील आशा-आकांक्षा बोलून दाखवतात
गजेंद्र अहिरे यांचा हिंदी कवितासंग्रह लवकरच; ‘बुकगंगा’तर्फे होणार प्रकाशित पुणे : संवेदनशील दिग्दर्शक म्हणून परिचित असलेले गजेंद्र अहिरे हे उत्तम लेखक, कवी, गीतकारही आहेत. त्यांनी लिहिलेल्या हिंदी कविता, गझल यांचे ‘आधा पागल’ हे पुस्तक ‘बुकगंगा’तर्फे लवकरच प्रकाशित करण्यात येणार आहे.
गवळदेवाचा नैवेद्य... कोकणात आजही खूप पारंपरिक प्रथा अगदी जाणीवपूर्वक जपल्या आहेत. गवळदेवाचा नैवेद्य ही त्यापैकीच एक मोठ्या अपूर्वाईनं जपलेली प्रथा. आपल्या पाळीव जनावरांना जिवापलीकडे जपणाऱ्या व गोवंशाची काळजी घेणाऱ्या अशा निसर्ग देवतेप्रति प्रामाणिक श्रद्धेची भावना असणे ही खचितच अंधश्रद्धा नाही. शिवाय या देवतेप्रति कृतज्ञता

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language